बेळगांव: गो-गो स्पोर्ट्स बेळगाव यांच्या वतीने आयोजित ‘मृगेंद्र गौडा चषक – 2026’ हाफ पीच क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना धर्मवीर संभाजी उद्यान, महाद्वार रोड येथे उत्साहात पार पडला. रंगतदार अंतिम लढतीत श्री राम सेना हिंदुस्थान अनगोळ संघाने 29 धावांनी विजय मिळवत 51,000 रुपयांचे प्रथम पारितोषिक आणि मानाचा चषक आपल्या नावावर केला.
अंतिम सामना सहा षटकांचा होता. नाणेफेक जिंकून गो-गो स्पोर्ट्स बेळगाव संघाने प्रथम गोलंदाजी स्वीकारली. फलंदाजीस उतरलेल्या श्री राम सेना हिंदुस्थान अनगोळ संघाने आक्रमक खेळ करत 6 षटकांत 4 बाद 62 धावांची भक्कम मजल मारली.
63 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना गो-गो स्पोर्ट्स बेळगाव संघाला अपेक्षित गती मिळाली नाही. त्यांनी 6 षटकांत 3 गडी गमावत केवळ 33 धावा केल्या. परिणामी श्री राम सेना हिंदुस्थानने सहज विजय मिळवत चषकावर आपले नाव कोरले.
अंतिम सामन्यातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल अक्षय जितकर (एस.आर.एस. हिंदुस्थान) याला सामनावीर पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यानेच मालिकावीर किताबही पटकावला आणि रेंजर सायकलने सन्मानित करण्यात आले.
मालिकेतील उत्कृष्ट फलंदाज म्हणून अलरजा गांधीनगर संघाचा अमीर गौरविण्यात आला, तर उत्कृष्ट गोलंदाजाचा किताब गो-गो स्पोर्ट्स बेळगावच्या सोमनाथने मिळवला.
स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभास मृगेंद्र गौडा, राहुल मुचंडी आणि जुवेकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. स्थानिक क्रिकेटप्रेमींच्या मोठ्या उपस्थितीत स्पर्धेचा समारोप झाला.
बेळगावातील स्थानिक क्रिकेटला चालना देणारी ही स्पर्धा खेळाडूंसाठी प्रेरणादायी ठरल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.

