बेंगलोर शिवाजीनगर मेट्रो स्टेशनच्या नामांतराला विरोध
बेळगाव :
बेंगलोर येथील शिवाजीनगर मेट्रो स्टेशनचे नाव बदलून “सेंट मेरी मेट्रो स्टेशन” करण्याचा प्रस्ताव रद्द करून त्याला “छत्रपती शिवाजी महाराज मेट्रो स्टेशन” म्हणून अधिकृत मान्यता द्यावी, अशी ठाम मागणी श्रीराम सेना हिंदुस्तान व हमारा देश संघटनेतर्फे करण्यात आली आहे.
सोमवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून या मागणीचे निवेदन सादर करण्यात आले. राष्ट्रीय अध्यक्ष रमाकांत कोंडुस्कर यांच्या नेतृत्वाखालील या आंदोलनात कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती. निवेदन जिल्हाधिकाऱ्यांच्या सहाय्यकांनी स्वीकारले असून, पुढील कार्यवाहीची ग्वाही दिली आहे.
रमाकांत कोंडुस्कर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव हटवून सेंट मेरी असे नाव देणे हा शिवभक्तांचा अवमान आहे. “सेंट मेरी या नावाला आम्हाला विरोध नाही, पण ते दुसऱ्या नव्या स्थानकाला देता येईल. शिवाजी महाराज हे राष्ट्रीय नायक असून, त्यांच्या नावाने प्रेरणा घेणारे लाखो लोक देशभरात आहेत. त्यांची ओळख पुसण्याचा कुठलाही प्रयत्न सहन केला जाणार नाही,” असा इशारा त्यांनी दिला.
https://youtu.be/xElFfsg6BS8?si=FDX5hOHhcjP-BEO5
निवेदनात असेही नमूद करण्यात आले की, शिवाजीनगर परिसराची ऐतिहासिक व सांस्कृतिक ओळख शिवरायांशी जोडलेली आहे. नामांतर केल्याने केवळ भावनांचा अपमान होणार नाही तर वारसा नष्ट होईल. त्यामुळे सरकारने हा प्रस्ताव मागे घेऊन त्या स्थानकाला अधिकृतपणे “छत्रपती शिवाजी महाराज मेट्रो स्टेशन” असे घोषित करावे, अशी मागणी संघटनांनी केली आहे.

