महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न आणि सीमाभागातील मराठी भाषा-संस्कृतीच्या जतनासाठी कार्यरत असलेल्या मध्यवर्तीय महाराष्ट्र एकीकरण समितीच्या अध्यक्षपदी प्रकाश मरगाळे यांची एकमुखी निवड करण्यात आली आहे. समितीचे माजी अध्यक्ष दीपक दळवी यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या या पदासाठी मंगळवारी झालेल्या विशेष बैठकीत सर्वानुमते मरगाळे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.
यापूर्वी खजिनदार म्हणून काम पाहिलेल्या मरगाळे यांच्यावर आता समितीचे नेतृत्व करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. निवडीची घोषणा होताच कार्याध्यक्ष व माजी आमदार मनोहर किणेकर यांनी त्यांचा सत्कार करून अभिनंदन केले. यावेळी “छत्रपती शिवाजी महाराज की जय” आणि “संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे” अशा घोषणांनी वातावरण भारावून गेले.
आपल्या भाषणात किणेकर यांनी मरगाळे यांच्या नेतृत्वाखाली समिती नव्या जोमाने कार्यरत होईल, असा विश्वास व्यक्त केला. मराठी जिल्हा पत्रकार संघाच्या एक लाख सह्यांच्या मोहिमेपासून त्यांच्या कार्यकाळाची सुरुवात होणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच कन्नड सक्तीविरोधातील आंदोलन प्रभावीपणे उभारण्याचे आवाहनही त्यांनी केले.
कर्नाटक सरकारच्या नामफलक धोरणावर भाष्य करताना किणेकर यांनी 60 टक्के कन्नड आणि 40 टक्के इतर भाषांच्या नियमानुसार मराठीला न्याय्य स्थान मिळाले पाहिजे, अशी ठाम भूमिका मांडली. याची अंमलबजावणी सर्वप्रथम सरकारी कार्यालयांमध्ये व्हावी, अशी मागणीही त्यांनी केली.
मराठी नामफलक हटवण्याचा कोणताही प्रयत्न सहन केला जाणार नाही, असा इशारा देत पुढील सर्व आंदोलनांमध्ये समितीचे पदाधिकारी मरगाळे यांच्या नेतृत्वाखाली एकत्र राहतील, अशी ग्वाही त्यांनी दिली.
बैठकीस सरचिटणीस तथा माजी महापौर मालोजीराव अष्टेकर, जनसंपर्क प्रमुख विकास कलघटगी आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.

