बेळगाव शहरातील केळकर बाग परिसरात असलेल्या श्री काणे महाराजांच्या श्री राम मंदिरात रामनवमी उत्सव अत्यंत भक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. या निमित्ताने मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
या मंदिराची स्थापना श्री काणे महाराजांच्या मार्गदर्शनाखाली काका महाराज उर्फ वसंतराव कुलकर्णी यांनी केली असून, अनेक वर्षांपासून येथे रामनवमी उत्सवाची परंपरा अखंड सुरू आहे. धार्मिक परंपरेनुसार, श्री प्रभू रामचंद्रांनी श्री काणे महाराजांना पंचमी दिवशी दर्शन दिल्याची श्रद्धा आहे. त्यामुळे या मंदिरात पंचमीपासूनच रामनवमी उत्सवाला सुरुवात केली जाते.
रामनवमीच्या दिवशी सकाळी अभिषेक आणि महापूजा पार पडली. त्यानंतर रामजन्म सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमानंतर उपस्थित भाविकांना प्रसादासह खिचडीचे वितरण करण्यात आले. दिवसभर मंदिरात दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी दिसून आली आणि परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला.

