राणी चन्नम्मा चौकात शेतकऱ्यांची अनोखी पंगत
बेळगाव :
शहरातील खासगी ‘जय किसान भाजी मार्केट’ पुन्हा सुरू करण्याच्या मागणीसाठी सोमवारी हजारो शेतकरी, व्यापारी, हमाल, मजूर आणि टॅक्सीचालकांनी बेळगावात भव्य मोर्चा काढला. या आंदोलनाची वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणजे राणी चन्नम्मा चौकात शेतकऱ्यांनी थेट रस्त्यावर पंगत मांडून जेवण केले. चौकाच्या इतिहासात पहिल्यांदाच घडलेल्या या घटनेने संपूर्ण शहराचे लक्ष वेधून घेतले.
मोर्चाला जय किसान भाजी मार्केटपासून सुरुवात झाली. गांधीनगर ओव्हरब्रिज सर्व्हिस रोडमार्गे जात शेकडो शेतकरी हातात फलक घेऊन आणि घोषणा देत राणी चन्नम्मा चौकात दाखल झाले. सौंदत्ती, कित्तूर, खानापूर, बैलहोंगलसह जिल्ह्यातील विविध तालुक्यांतून मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते.
चौकात पोहोचल्यावर आंदोलकांनी जिल्हाधिकारी आणि पालकमंत्र्यांना तातडीने घटनास्थळी येण्याची मागणी केली. “अधिकारी येईपर्यंत आम्ही इथून हलणार नाही,” असा ठाम पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला. शेतकऱ्यांचे म्हणणे होते की, राज्यातील सर्वात मोठा जिल्हा म्हणून बेळगावात दोन भाजी मार्केट असणे हे शेतकऱ्यांच्या फायद्याचे आहे. तसेच, खासगी मार्केटमध्ये व्यापाऱ्यांशी शेतकऱ्यांचे सलोख्याचे संबंध असून त्याचा थेट लाभ त्यांना मिळत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
केंद्र सरकारने खासगी भाजी मार्केट सुरू करण्यास परवानगी दिलेली असताना आणि बांधकाम नियमानुसार झालेले असतानाही कारवाई का झाली, असा सवाल शेतकरी नेत्यांनी उपस्थित केला.
दरम्यान, भाजपचे शिष्टमंडळ आंदोलकांना भेटले. माजी आमदार संजय पाटील यांनी शेतकऱ्यांवरील अन्याय दूर करण्याची मागणी केली. खासदार इराण्णा कडाडी आणि पाटील यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी शेतकऱ्यांना आश्वासन दिले की, “तात्पुरत्या स्वरूपात किरकोळ खरेदी-विक्रीस परवानगी दिली जाईल. मात्र घाऊक व्यवहाराबाबत निर्णय उद्या उच्च न्यायालयाच्या सुनावणीनंतरच होईल.”
या आश्वासनामुळे शेतकरी काही प्रमाणात शांत झाले, तरी घाऊक व्यापार सुरू करण्याच्या मागणीवर ते ठाम राहिले. सकाळपासून चौकात ठाण मांडून बसलेल्या शेतकऱ्यांनी दुपारपर्यंत अधिकारी न आल्याने रस्त्यावरच पंगत करून आपली नाराजी व्यक्त केली. वाहतुकीच्या केंद्रबिंदू असलेल्या चौकात शेतकऱ्यांनी दिलेला हा अनोखा संदेश शहरभर चर्चेचा विषय ठरला आहे.

