बेळगाव : कणबर्गी गावात धार्मिक-सांस्कृतिक वातावरण अधिक वृद्धिंगत करण्यासाठी श्री रेनुका यल्लम्मा मंदिराच्या जिर्णोद्धारासह श्री मातंगी देवीच्या नवीन मंदिर बांधकामाचा शुभारंभ झाला. या दोन्ही प्रकल्पांच्या भूमिपूजेनंतर बोलताना मंदिर समितीचे अध्यक्ष नागेश गड्डे यांनी, “मंदिरांमुळे समाजात शांतता, सुसंवाद आणि सहजीवनाची भावना दृढ होते. गावाच्या समृद्धीसाठी हे उपक्रम महत्त्वाचे आहेत,” असे मत व्यक्त केले.
कणबर्गीतील ग्रामस्थांचा गेल्या अनेक दशकांपासून सवडत्ती येथील श्री यल्लम्मा गुड्डी यात्रेशी अतूट भावनिक संबंध आहे. दरवर्षी हजारो भाविक ‘पड्डलगी’ पारंपरिक पद्धतीने भरून देवतेचा आशीर्वाद घेतात. गावात परतल्यानंतरही येथे एक विशेष यात्रा आयोजित करण्याची परंपरा चालत आली आहे. 1992 साली या स्थळी प्रथम मंदिर उभारण्यात आले होते आणि तेव्हापासून येथे भव्य धार्मिक उत्सव साजरे होत आहेत.
सध्या सुरू असलेल्या जिर्णोद्धार आणि नवीन मंदिर उभारणीमुळे ग्रामस्थांना पूजा-अर्चा आणि यात्रांचे आयोजन अधिक सुलभ होणार असल्याचे गड्डे यांनी सांगितले. कणबर्गीतील 700 पैकी सुमारे 500–600 पड्डलगी येथे भरल्या जातात, त्यामुळे भाविकांची सोय लक्षात घेऊन मंदिराचा विस्तार करण्यात येत आहे.
या प्रसंगी उपाध्यक्ष प्रकाश मुच्छंडीकर, प्रकाश गुंडलगुंपि, सचिव सिद्राई शिगिहळी, खजिनदार आक्काताई मालाई, P.G. पावशे, महेश शिगिहळी, भैरगौडा पाटील, सुबाष (अप्पु) कुरुब, शिवय्या मठपती यांसह गावातील अनेक मान्यवर आणि भाविक उपस्थित होते. जिर्णोद्धारासाठी मोठ्या प्रमाणावर ग्रामस्थांनी स्वयंस्फूर्तीने देणग्या देऊन भक्ति-भाव प्रकट केला.

