बेळगाव | प्रतिनिधी
कर्नाटक राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री व बेळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्या निर्देशानुसार कडोली जिल्हा पंचायत कार्यक्षेत्रातील हंदिनूर गावात होणाऱ्या नव्या ग्रामपंचायत इमारतीच्या उद्घाटनापूर्वी आज, शनिवार ३१ जानेवारी २०२६ रोजी पाहणी करण्यात आली.
मंत्री सतीश जारकीहोळी, चिक्कोडी लोकसभा मतदारसंघाच्या खासदार कु. प्रियांका जारकीहोळी तसेच युवा नेते श्री. राहुल जारकीहोळी यांच्या आदेशानुसार मंत्र्यांचे निकटवर्तीय सहाय्यक व केपीसीसी सदस्य मलगौडा पाटील यांनी सकाळी हंदिनूर ग्रामपंचायत परिसरास भेट देऊन कार्यक्रमाच्या तयारीचा सविस्तर आढावा घेतला.
उद्घाटन सोहळा रवीवारी (१ फेब्रुवारी) होणार असून त्यासाठी आवश्यक असलेल्या सुविधा, स्वच्छता, बैठक व्यवस्था व ग्रामस्थांच्या सहभागाबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या.
या पाहणीवेळी ग्रामपंचायत अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व सदस्य तसेच गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. नव्या ग्रामपंचायत इमारतीमुळे प्रशासन अधिक सुलभ होऊन ग्रामीण विकासाला गती मिळेल, अशी भावना यावेळी ग्रामस्थांनी व्यक्त केली.

