बेळगाव शहर पोलीस आयुक्तालयाच्या सीएआर विभागातील आरएसआय संगमेश एस. आनी यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय यश संपादन करत शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. श्रीलंकेतील Colombo येथे २२ फेब्रुवारी रोजी पार पडलेल्या प्रतिष्ठित IRONMAN 70.3 स्पर्धेत त्यांनी अत्यंत प्रतिकूल हवामानातही स्पर्धा पूर्ण केली.
मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर ९० किलोमीटर सायकलिंगचा टप्पा त्यांनी २ तास ५१ मिनिटांत पूर्ण केला, तर २१ किलोमीटर धावण्याचे अंतर २ तास ०५ मिनिटांत पार केले. एकूण ५ तास ०९ मिनिटांत स्पर्धा पूर्ण करत त्यांनी शारीरिक सामर्थ्याबरोबरच मानसिक ताकदही सिद्ध केली.
पोलीस आयुक्तांकडून गौरव
या उल्लेखनीय यशाबद्दल बेळगावचे पोलीस आयुक्त Bhushan Borase यांनी संगमेश आनी यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला. यावेळी उपायुक्त नारायण बरमणी, निरंजन राजे अरस तसेच इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
आनी यांची ही कामगिरी पोलीस दलातील शिस्त, समर्पण आणि क्रीडाप्रेम यांचे प्रेरणादायी उदाहरण असल्याचे आयुक्तांनी नमूद केले. कर्तव्याचा व्याप सांभाळत आंतरराष्ट्रीय स्पर्धेत यश मिळवणे ही अभिमानास्पद बाब असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
खाकी वर्दीत राहून जागतिक स्तरावर बेळगावचे नाव उज्ज्वल करणाऱ्या संगमेश आनी यांच्या या पराक्रमामुळे संपूर्ण राज्य पोलीस दलाचा गौरव वाढला आहे.

