गोकाकमध्ये ‘पैसे चारपट’ घोटाळा उघडकीस; दोन पोलीस कर्मचाऱ्यांसह सात जण अटकेत
बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील गोकाक शहरात पैसे दुप्पट किंवा चारपट करून देण्याचे आमिष दाखवत सर्वसामान्य नागरिकांची फसवणूक करणाऱ्या एका आंतरराज्य टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात महाराष्ट्रातील दोन पोलीस कर्मचाऱ्यांसह एकूण सात जणांना अटक करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक के. रामराजन यांनी दिली.
पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार गोकाक शहरातील श्रीनगर परिसरातील एका घरावर छापा टाकण्यात आला. या कारवाईदरम्यान पैसे चारपट करून देण्याचा बनाव करून लोकांची फसवणूक करणारी टोळी पोलिसांच्या जाळ्यात अडकली.
या टोळीतील परशुराम भीमशी बडकटी, इमरान बाबाजान जुनेदी, जयश्री बाबू कांबळे, मनीषा राजू गायकवाड, उज्ज्वला तुळशीराम बिलाने यांच्यासह महाराष्ट्र पोलीस दलातील अनंत प्रकाश नरवाडे आणि दिलदार रब्बानी शेख या दोन कर्मचाऱ्यांनाही अटक करण्यात आली आहे.
तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, ही टोळी पांढऱ्या कागदाला काळ्या रंगाचा लेप देऊन त्याला खऱ्या चलनासारखे दाखवत असे. विशेष रासायनिक प्रक्रियेद्वारे नोटा तयार होतात असा बनाव करून नागरिकांना पैसे गुंतवण्यास भाग पाडले जात होते आणि त्यानंतर त्यांची फसवणूक केली जात होती.
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक के. रामराजन यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. अतिरिक्त पोलीस अधीक्षक रामगोंडा बसरगी, डीवायएसपी रवी नाईकडी आणि सीपीआय सुरेशबाबू आर.बी. यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांच्या पथकाने ही धाडसी कारवाई केली.
पोलिसांनी आरोपींकडून काही साहित्य जप्त केले असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

