बेळगाव शहरातील न्यू गुड्स शेड रोड येथील रहिवासी श्रेया नितीन भातकांडे हिने अमेरिकेतून कमर्शियल पायलट लायसन्स (CPL) मिळवत बेळगावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. तिच्या या उल्लेखनीय आणि ऐतिहासिक यशाबद्दल सकल मराठा समाज व किरण जाधव फाउंडेशनच्या वतीने तिचा गौरवपूर्ण सत्कार करण्यात आला.
श्रेया भातकांडे हिचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण सेंट जोसेफ हायस्कूल, बेळगाव येथे झाले असून, आर.एल.एस. सायन्स कॉलेजमधून तिने पीयूसी (विज्ञान) शिक्षण पूर्ण केले आहे. लहानपणापासून वैमानिक होण्याचे स्वप्न उराशी बाळगलेल्या श्रेयाने या ध्येयाच्या दिशेने सातत्यपूर्ण मेहनत सुरू ठेवली.
व्यावसायिक वैमानिक होण्यासाठी तिने पुणे येथील किटी हॉक अकॅडमीमध्ये डीजीसीए (DGCA) ग्राउंड क्लासेस पूर्ण केले. त्यानंतर नागरी विमान वाहतूक संचालनालयाची परीक्षा यशस्वीरित्या उत्तीर्ण करत तिने पुढील टप्प्यात दिल्ली येथून आरटीआर (Radio Telephony Restricted) परवाना प्राप्त केला.
उड्डाण प्रशिक्षणासाठी श्रेया अमेरिकेला रवाना झाली. फ्लोरिडा येथील एनएस एव्हिएशन इंक., फोर्ट लॉडरडेल येथे अवघ्या एका वर्षात कठोर व खडतर प्रशिक्षण पूर्ण करून तिने कमर्शियल पायलट लायसन्स मिळवले.
बेळगाव ते पुणे, पुणे ते दिल्ली आणि दिल्ली ते अमेरिका असा प्रवास करत मिळवलेले हे यश आजच्या तरुण पिढीसाठी विशेषतः मुलींसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
या सत्कार समारंभाला सकल मराठा समाजाचे पदाधिकारी, किरण जाधव फाउंडेशनचे प्रतिनिधी व मान्यवर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी श्रेयाच्या जिद्दीचे कौतुक करत तिच्या उज्ज्वल भविष्यास शुभेच्छा दिल्या.

