बेळगाव | क्रीडा प्रतिनिधी
बेळगावचा युवा आणि गुणवान खेळाडू शुभम साखे याने कोल्हापूर येथे पार पडलेल्या बर्गमन ट्रायथलॉन स्पर्धा मालिकेत उत्कृष्ट कामगिरी करत विजेतेपदावर आपले नाव कोरले. पोहणे, सायकलिंग आणि धावणे या तीनही कठीण टप्प्यांमध्ये उल्लेखनीय सहनशक्ती, शिस्तबद्ध प्रशिक्षण आणि कौशल्याचे दर्शन घडवत शुभमने अव्वल खेळाडूंना मागे टाकले.
या स्पर्धेत राज्यातील तसेच देशातील अनेक अनुभवी खेळाडू सहभागी झाले होते. तीव्र स्पर्धेच्या वातावरणातही शुभम साखेने संयम, वेग आणि अचूक रणनीतीच्या जोरावर यश संपादन केले. या कामगिरीमुळे त्याला प्रतिष्ठित ‘बर्गमन ट्रायथलॉन विजेता’ हा मान मिळाला.
यापूर्वी स्केटिंगमध्येही उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शुभमसाठी हे यश केवळ वैयक्तिक विजय नसून, बेळगावच्या क्रीडा क्षेत्रासाठी अभिमानाची बाब ठरली आहे. त्याची ही कामगिरी ट्रायथलॉनसारख्या सहनशक्तीच्या खेळांकडे वळू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी प्रेरणादायी आहे.

