शुभम शेळके यांना पाच लाख दंडाची नोटीस; निर्णयावर न्यायालयात आव्हान
बेळगाव :
महाराष्ट्र एकीकरण समिती (एमईएस) सीमाभागचे अध्यक्ष आणि युवा नेते शुभम शेळके यांना बेळगाव पोलीस प्रशासनाकडून पाच लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला असून, या आदेशाला जिल्हा सत्र न्यायालयात वकील महेश बिर्जे यांच्या माध्यमातून आव्हान देण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, माळमारुती पोलीस ठाण्याच्या शिफारशीवरून कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी दिलेल्या प्रतिबंधात्मक सूचनेचे उल्लंघन झाल्याचा ठपका ठेवून ही कारवाई करण्यात आली आहे. संबंधित नोटीसमध्ये शुभम शेळके यांच्याविरुद्ध पूर्वी विविध गुन्ह्यांची नोंद असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
या कारवाईनंतर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कायदेशीर पथकाने न्यायालयीन मार्गाचा अवलंब केला आहे.
अॅड. महेश बिर्जे यांनी सांगितले की, “या आदेशाविरोधात आम्ही कायदेशीर भूमिका मांडणार असून निर्णय न्यायालयाच्या अधीन राहील.”
यापूर्वीही समितीचे इतर काही पदाधिकारी — माजी आमदार मनोहर किणेकर, मालोजी अष्टेकर आणि प्रकाश मरगाळे — यांनाही पाच लाख रुपयांच्या प्रतिबंधात्मक नोटीसी देण्यात आल्याची माहिती आहे. त्या नोटीसीविरोधातही न्यायालयात दाद मागण्यात आली आहे.
दरम्यान, शुभम शेळके यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, “आमचा लढा कायदेशीर मार्गानेच सुरू राहील आणि आम्ही कोणत्याही दबावाला झुकणार नाही.”
या प्रकरणी पुढील सुनावणी जिल्हा सत्र न्यायालयात होणार आहे.

