सीमाभागात पुन्हा दडपशाही? युवा नेते शुभम शेळके यांना पोलिसांकडून चौकशीसाठी ताब्यात घेतले!
बेळगाव : सीमाभागात मराठी कार्यकर्त्यांवर पोलिस प्रशासनाची करडी नजर पुन्हा एकदा दिसून आली आहे. नुकतेच युवा समिती सीमाभागचे युवा नेते शुभम शेळके यांना माळमारुती पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे.
अलीकडेच कन्नड रक्षण वेदिकेचे अध्यक्ष नारायण गौडा यांनी बेळगावात येऊन मराठी भाषिकांविषयी भडकाऊ विधान केले होते. “मराठी जनतेने काळा दिन पाळला तर बेळगाव रणभूमी बनेल” आणि “मराठी लोकांनी बेळगाव सोडावे” अशा प्रकारची प्रक्षोभक वक्तव्ये त्यांनी केली होती. या वक्तव्याचा निषेध करत शुभम शेळके यांनी सोमवारी त्याला तीव्र शब्दांत उत्तर दिले होते.
याच पार्श्वभूमीवर माळमारुती पोलीस ठाण्याकडून शेळके यांची चौकशी सुरू असून, या प्रकरणाची अधिकृत पुष्टी अद्याप मिळालेली नाही. मात्र, मराठी भाषिकांमध्ये या कारवाईबाबत तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
मराठी कार्यकर्त्यांवर कारवाई करताना प्रशासन तत्पर दिसते, पण गौडा यांच्या भडकाऊ वक्तव्यावर मात्र कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही, अशी टीका मराठी वर्तुळातून होत आहे. सीमाभागात मराठी माणसाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोपही मराठी संघटनांकडून करण्यात येत आहे.

