कंग्राळी बिकेतील पाणीटंचाईला उपाय – चव्हाट गल्लीमध्ये नवीन बोरवेलची सुरूवात
बेळगाव तालुक्यातील कंग्राळी बिके ग्रामपंचायतीच्या वार्ड क्रमांक ४ मधील चव्हाट गल्ली परिसरात गेल्या काही महिन्यांपासून तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत होता. या समस्येची दखल घेऊन वार्ड सदस्य रेखा इंडीकर यांच्या पुढाकाराने आणि MLC लखन जारकीहोळी यांच्या निधीतून या ठिकाणी बोरवेलचे काम हाती घेण्यात आले आहे.
बोरवेल मशीनचे पूजन करून या कामाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी ग्रामपंचायत अध्यक्षा रोहिणी नाथबुवा, उपाध्यक्षा दीपा पम्मार यांच्यासह सदस्य अनिल पावशे, दत्ता पाटील, संध्या चौगुले, दादासाहेब बद्दरगडे, सुचिता कोळी, वेदिका पठाणे, नवनाथ पुजारी, तानाजी विठ्ठल पाटील, मेनका कुर्डे, अॅड. सुधीर चव्हाण, कर्मचारी यल्लाप्पा पाटील, विशाल पाटील तसेच बाल संभाजी युवक मंडळाचे पदाधिकारी व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या वेळी बोलताना अॅड. सुधीर चव्हाण यांनी सांगितले की, एप्रिल-मे महिन्यात या भागात पाण्याचे मोठे संकट होते. ते लक्षात घेऊन रेखा इंडीकर यांनी तातडीने पुढाकार घेत बोरवेलची सोय करून दिली आहे. त्यांच्या या उपक्रमाचे त्यांनी कौतुक केले. पुढे बोलताना त्यांनी सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी एकत्रितपणे काम करून गावाचा विकास साधावा, असेही आवाहन केले.
https://youtube.com/shorts/JbreyY0umvQ?si=zFqXwddIblFQaJwk
चव्हाट गल्लीतील नागरिकांसाठी हा उपक्रम दिलासादायक ठरत असून, दीर्घकाळाची पाणीटंचाई आता मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे.

