बेळगाव:DYES स्पोर्ट्स हॉस्टेल, बेळगाव येथील ज्यूडो खेळाडूंनी राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करत कर्नाटक राज्याचा क्रीडा नावलौकिक उंचावला आहे. शिस्तबद्ध प्रशिक्षण, सातत्यपूर्ण सराव आणि तांत्रिक कौशल्याच्या बळावर या खेळाडूंनी देशपातळीवर आपली छाप उमटवली आहे.
कर्नाटक राज्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या अंजली पाटील हिने २२ ते २८ जानेवारी २०२६ दरम्यान मणिपूर येथे पार पडलेल्या ६९व्या राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेत रौप्य पदकाची कमाई केली. स्पर्धेतील पहिल्याच लढतीत तिने पश्चिम बंगालच्या खेळाडूवर वझारीने मात केली. त्यानंतर दिल्ली, राजस्थान आणि मणिपूरच्या बलाढ्य प्रतिस्पर्ध्यांना पराभूत करत तिने थेट अंतिम फेरी गाठली. अंतिम सामन्यात महाराष्ट्राच्या खेळाडूविरुद्ध अटीतटीच्या लढतीत पराभव स्वीकारावा लागला, मात्र तिच्या खेळाचे सर्वत्र कौतुक झाले.
याच कालावधीत, कोलकाता येथे झालेल्या ज्युनियर राष्ट्रीय ज्यूडो स्पर्धेत DYES स्पोर्ट्स हॉस्टेलचीच खेळाडू साईश्वरी के. हिने कांस्य पदक पटकावत आपली गुणवत्ता सिद्ध केली. सुरुवातीच्या फेऱ्यांमध्ये तिने जम्मू-काश्मीर, उत्तर प्रदेश आणि पंजाबच्या खेळाडूंवर मात केली. उपांत्य फेरीत पराभव पत्करल्यानंतरही, कांस्य पदकासाठी झालेल्या लढतीत केरळच्या खेळाडूला पराभूत करत तिने तिसरे स्थान निश्चित केले.
दोन्ही खेळाडू जिल्हा स्टेडियम, बेळगाव येथे एनआयएस प्रशिक्षक रोहिणी पाटील व कुतुजा मुलतानी यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत असून, उपसंचालक श्रीनिवास बी. यांचे त्यांना सातत्यपूर्ण मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभत आहे.
या यशामुळे DYES स्पोर्ट्स हॉस्टेलमधील उत्कृष्ट प्रशिक्षण पद्धती, खेळाडूकेंद्री दृष्टिकोन आणि सक्षम क्रीडा वातावरण पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

