बेळगावच्या स्वाती पाटीलला "दसराकिशोरी" किताब – मंत्री सतीश जारकिहोळींकडून सन्मान
बेळगाव : मंगळूरच्या दसरामहोत्सवातील राज्यस्तरीय महिला कुस्ती स्पर्धेत बेळगावच्या डी.वाय. स्पोर्ट्स हॉस्टेलची विद्यार्थिनी स्वाती पाटील हिने प्रथम क्रमांक पटकावत "दसराकिशोरी" किताब मिळविला. तिच्यासह कुस्तीमध्ये विजेतेपद मिळवलेल्या विद्यार्थिनींचा लोकोपयोगी खात्याचे व जिल्हा पालक मंत्री सतीश जारकिहोळी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कुवेंपू नगर येथील खासगी निवासस्थानी झालेल्या या कार्यक्रमात मंत्री जारकिहोळी यांनी विजेत्या विद्यार्थिनींशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. "दसराकिशोरी पुरस्कार हा दसराकुस्ती महोत्सवाचा महत्त्वाचा भाग असून, महिला कुस्तीपटूंना प्रोत्साहन देण्यासाठी हा उपक्रम राबविला जातो. स्वाती पाटीलने मिळवलेला हा किताब बेळगावसाठी अभिमानाची बाब आहे," असे मत त्यांनी व्यक्त केले.
या वेळी आमदार आसिफ (राजू) सेठ, मंत्रींचे निकटवर्तीय मलगौड पाटील, डी.वाय. स्पोर्ट्स हॉस्टेलचे प्रशिक्षक स्मिता पाटील, मल्लीनाथ मादर यांच्यासह स्वाती पाटीलचे आई-वडील उपस्थित होते.

