बेळगाव :महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 29 अंतर्गत येणाऱ्या हिंदवाडी परिसरातील चौथा व पाचवा क्रॉस येथील सर्व्हिस रोडवर गेल्या अनेक वर्षांपासून अस्वच्छतेचे साम्राज्य पसरले होते. कचरा, दुर्गंधी आणि डबकी यामुळे स्थानिक नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत होते. या पार्श्वभूमीवर सर्व्हिस रोडची स्वच्छता करून पेव्हर्स बसवावेत, अशी सातत्यपूर्ण मागणी नागरिकांकडून होत होती.
या नागरिकांच्या मागणीची दखल घेत स्थानिक नगरसेवक नितीन जाधव यांनी महापालिकेकडे सातत्याने पाठपुरावा केला. अखेर हिंदवाडी भंगीबोळ परिसरात सर्व्हिस रोडवर पेव्हर्स बसविण्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे. त्यामुळे तब्बल 70 वर्षांपासून प्रलंबित असलेली समस्या मार्गी लागली असून परिसरातील गलिच्छ वातावरण दूर होण्यास मोठी मदत झाली आहे.
पूर्वी या ठिकाणी कचऱ्याचे ढीग साचत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले होते. मात्र आता पेव्हर्स बसविल्यामुळे परिसर स्वच्छ, सुस्थितीत आणि रहदारीसाठी सुलभ झाला आहे. या विकासकामाबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त करत नगरसेवक नितीन जाधव यांचे आभार मानले आहेत.
या प्रसंगी नागराजा एच. व्ही., रविकुमार पुजारी, निखिल बाचुलकर, हलदंकर, ममता पुजारी, अपारती सुरुटेकर यांच्यासह अनेक स्थानिक नागरिक उपस्थित होते.

