कोगनोळी येथे आयोजित करण्यात आलेल्या बैलजोडी, बैल घोडा, घोडा जोडी आणि घोडेस्वारी शर्यतीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पावसात शर्यतीचा थरार अनुभवण्यासाठी पंचक्रोशीतील लोकांनी मोठी गर्दी केली होती. चिखल आणि निसरड्या रस्त्यावरून बैलजोडी, घोडजोडी पळवतांना चालकांचे आणि स्वारांची कसोटी लागली होती.
बेळगाव जिल्ह्यातील कोगनोळी येथील ग्राम दैवत अंबिका देवीच्या नवरात्रोत्सवा निमित्त शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते.महाराष्ट्र आणि कर्नाटकतून आलेल्या बैलजोड्या, घोडजोडीनी शर्यतीत सहभाग नोंदवला होता. बैलजोड्या वेगाने पळाव्यात म्हणून त्यांच्या बरोबरीने मोटारसायकलस्वार वेगाने आरडा ओरडा करत जात होते. शर्यतीच्या मार्गांवर लोकांनी शर्यत पाहण्यासाठी गर्दी केली होती.बैलजोडी शर्यतीत कोगनोळी येथील गजानन पाटील यांची जोडी अव्वल ठरली.
दानोळी येथील अमोल गाटकर यांच्या बैलजोडीने द्वितीय क्रमांक मिळवला.घोडेस्वार शर्यतीत वसगडे येथील धोंडीराम धनगर यांनी प्रथम क्रमांक पटकवला.बैलगाडी शर्यतीत कोगनोळीच्या शाहरुख बागवान यांनी प्रथम क्रमांक तर हुपरीच्या लालू घाटगे यांनी द्वितीय क्रमांक मिळवला.घोडागाडी शर्यतीत भंपू पाटील,संतोष पाटील आणि सर्जेराव मुदाळे यांनी बक्षिसे मिळवली. विजेत्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते रोख रक्कम आणि निशाण देऊन गौरविण्यात आले.

