बेळगाव:अयोध्या येथे प्रभू श्रीरामचंद्रांच्या भव्य मंदिरातील कळस व ध्वज पूजनाचा राष्ट्रीय सोहळा आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आरएसएस सरसंघचालक मोहन भागवत यांच्या उपस्थितीत अत्यंत दिमाखात पार पडला. देशभरात निर्माण झालेल्या भक्तिभावाच्या वातावरणाची प्रतीती वडगावातही दिसून आली.
या ऐतिहासिक प्रसंगाचे औचित्य साधत वडगाव येथील श्री विठ्ठल मंदिरात दुपारी 12.30 वाजता भगवा ध्वज पूजन आणि मंदिर कळस पूजनाचा सोहळा भक्तिमय वातावरणात झाला. मंदिर परिसर आकर्षक फुलसजावटीने, विद्युत रोषणाईने आणि धार्मिक प्रतीकांनी उजळून निघाला होता.
कार्यक्रमास विठ्ठल मंदिर विकास समितीचे अध्यक्ष मोहन लाड, तसेच राजू पाटील, भालचंद्र कल्लेद, विश्वनाथ सव्वाशेरी, विलास पोटे, डॉ. वैशाली पाटील, जयश्री भंडारे यांसह वारकरी संप्रदायातील संत, महिला भजनी मंडळाच्या अध्यक्षा रूपाली सव्वाशेरी, आणि भजनी मंडळातील बहुसंख्य भगिनी उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहिलेले श्री शंकर पाटील गुरुजी यांनी प्रभू श्रीरामचंद्राचे विधिवत पूजन केले. कार्यक्रमानंतर सर्व भक्तांना प्रसादाचे वितरण करण्यात आले.
सोहळा सुरळीत पार पाडण्यासाठी ह.भ.प. प्रमोद पवार, ह.भ.प. मोहन पाटील आणि संत मंडळींनी विशेष परिश्रम घेतले. संपूर्ण परिसरात भक्तिमय वातावरण, जयजयकार आणि आध्यात्मिक उत्साह यांचा सुंदर संगम पाहायला मिळाला.

