बेळगाव :
परंपरेचा वारसा जपत छत्रपती महिला मंडळ, गोंधळी गल्ली तर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही पारंपरिक हदगा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. गेल्या ५७ वर्षांपासून अखंडपणे सुरू असलेली ही परंपरा आजही महिलांच्या सहभागामुळे जिवंत ठेवण्यात आली आहे.
मंडळाच्या अध्यक्षा सुनिता प्रकाश कुरणे यांनी सांगितले की, “आजच्या युगात अनेक पारंपरिक प्रथा लुप्त होताना दिसतात; मात्र आमच्या मंडळात हदग्याची परंपरा सातत्याने जपली जात आहे.”
या हदग्याचा प्रारंभ पहिल्या दिवशी एका गाण्याने होतो, तर सोळाव्या दिवशी विशेष विधी आणि खिरापतीच्या प्रसादाने सांगता केली जाते. या १६ दिवसांत दर संध्याकाळी हदगा खेळला जातो. या निमित्ताने परिसरातील सर्व महिला एकत्र येऊन एकात्मतेचा आणि संस्कृतीचा अनोखा सोहळा साजरा करतात.
या प्रसंगी कु. शिल्पा केकरे, सुवर्णा कुरणे, संगीता कुंडेकर, माधुरी कुरणे, वंदना मुतकेकर यांसह अनेक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
कार्यक्रमाची सांगता पारंपरिक हदग्याच्या खिरापतीच्या वाटपाने करण्यात आली.

