बेळगाव : जिल्ह्यातील हंचीनाळ गावात पारंपरिक बैलगाडा, एक बैल-एक घोडा आणि घोडागाडी शर्यतींचे भव्य आयोजन करण्यात आले होते. या चुरशीच्या शर्यती पाहण्यासाठी कर्नाटक आणि महाराष्ट्रातून शर्यतप्रेमींनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती.
या स्पर्धांमध्ये सहभागी स्पर्धकांनी जबरदस्त कामगिरी करत उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. बैलगाडा शर्यतीत जुनूणी गावचे प्रभाकर व्हनमाने यांनी प्रथम क्रमांक पटकावत बाजी मारली. दानोळीचे सचिन मदने यांनी द्वितीय क्रमांक, तर आगड गावचे परसू जाधव यांनी तृतीय क्रमांक मिळवला.
घोडागाडी शर्यतीत डिग्रजचे समीर भय्या यांनी पहिला क्रमांक पटकावला. तसेच ‘एक घोडा-एक बैल’ या अनोख्या शर्यतीत हणबरवाडीचे विकी खोत यांनी प्रथम क्रमांक मिळवत आपली छाप पाडली.
या स्पर्धेचे उद्घाटन समाजसेवक संतोष गुरव यांच्या हस्ते करण्यात आले. शर्यतीदरम्यान बैल आणि घोड्यांना वेगाने धावण्यासाठी दुचाकीस्वारांकडून हाकारे देण्यात येत होते, त्यामुळे वातावरण अधिकच रंगतदार झाले होते.
एकूणच, पारंपरिक क्रीडाप्रकारांचा थरार अनुभवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर नागरिकांनी उपस्थिती लावली होती.

