बेळगांव (प्रतिनिधी) — विभागीय जिल्हास्तरीय नेटकॉल स्पर्धेत वनिता विद्यालय इंग्लिश मिडियम स्कूल, बेळगांव येथील मुलांनी अप्रतिम कामगिरी करत दोन्ही वयोगटांत विजेतेपद पटकावले आहे. U-17 आणि U-14 या दोन्ही गटांमध्ये वनिता विद्यालयाच्या खेळाडूंनी आपल्या उत्कृष्ट खेळामुळे बेळगांवचा झेंडा उंचावला.
U-17 गटातील अंतिम सामन्यात वनिता विद्यालयाने खानापूर संघावर 6-2 असा प्रभावी विजय मिळवला. या संघाचे नेतृत्व कर्णधार यश चौहुळे यांनी केले. U-14 गटातही वनिता विद्यालयाने खानापूर संघावर 6-1 असा एकतर्फी विजय मिळवत विजेतेपद आपल्या नावावर केले. या संघाचा कर्णधार मुर्सलीम होता.
संघाचे मार्गदर्शन प्रशिक्षक नागराज भगवंतनावर यांनी केले असून त्यांच्या प्रशिक्षणामुळेच शाळेच्या दोन्ही संघांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले.
अंतिम सामन्याचे पंच म्हणून जगदीश आणि मॉइझ मुल्ला यांनी काम पाहिले. प्रमुख पाहुणे म्हणून सिल्विया डिलीमा, मुकुंद सर, बालकृष्ण सर (खानापूर), संजय, मेरी, भावनी मॅडम आणि हेगनाईक सर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे उद्घाटन वनिता विद्यालय इंग्लिश मिडियम स्कूल बेलगावच्या प्राचार्या सौ. जोसेफिन गुन्टी यांच्या हस्ते करण्यात आले.
या विजयानंतर शाळेत आणि खेळाडूंमध्ये आनंदाचे वातावरण पसरले असून, दोन्ही संघ आता राज्यस्तरीय स्पर्धेसाठी सज्ज झाले आहेत.

