बेळगावच्या जलतरणपटूंनी पुन्हा एकदा आपल्या जलकौशल्याने राज्य क्रीडाक्षेत्रात नवा ठसा उमटवला आहे. स्विमर्स क्लब बेळगाव आणि अॅक्वेरियस स्विम क्लब बेळगाव यांच्या वयस्क जलतरणपटूंनी सहनशक्ती, तंत्र आणि चिकाटीचे अप्रतिम प्रदर्शन करत कर्नाटक जलतरण संघटना आयोजित २६ वी राज्यस्तरीय मास्टर्स स्विमिंग चॅम्पियनशिप २०२५ मध्ये घवघवीत यश संपादन केले.
ही स्पर्धा १ आणि २ नोव्हेंबर २०२५ रोजी विजयनगर अॅक्वाटिक सेंटर, बेंगळुरू येथे पार पडली. बेळगावच्या पथकाने प्रभावी कामगिरी करत एकूण १७ पदकांची (७ सुवर्ण, ३ रौप्य, ७ कांस्य) कमाई केली आणि राज्यभरातील अनुभवी जलतरणपटूंमध्ये आपली ताकद दाखवली.
अजय आचार्य – १०० मी. बॅकस्ट्रोक (सुवर्ण), १०० मी. बटरफ्लाय (सुवर्ण), २०० मी. वैयक्तिक मेडले (सुवर्ण), २०० मी. फ्रीस्टाइल (कांस्य), ४x५० मी. मेडले रिले (कांस्य)
रिधम त्यागी – १०० मी. बटरफ्लाय (सुवर्ण), ४x५० मी. फ्रीस्टाइल रिले (सुवर्ण), ५० मी. बॅकस्ट्रोक (रौप्य), ४x५० मी. मेडले रिले (रौप्य), १०० मी. बॅकस्ट्रोक (कांस्य), २०० मी. वैयक्तिक मेडले (कांस्य)
लक्ष्मण कुंभार – ५० मी. ब्रेस्टस्ट्रोक (सुवर्ण), १०० मी. ब्रेस्टस्ट्रोक (सुवर्ण), ४x५० मी. मेडले रिले (कांस्य)
सुषमा प्रभू – १०० मी. बटरफ्लाय (रौप्य)
एन. लोकप्पा – १०० मी. फ्रीस्टाइल (कांस्य), ४x५० मी. मेडले रिले (कांस्य)
राही कुलकर्णी – चौथा क्रमांक (उत्कृष्ट सहभाग)
या उत्कृष्ट कामगिरीच्या बळावर सुवर्णपदक विजेत्या जलतरणपटूंची राष्ट्रीय मास्टर्स जलतरण स्पर्धेसाठी निवड झाली असून, हे बेळगावच्या जलतरणविश्वासाठी अभिमानाची बाब मानली जात आहे.
ही यशस्वी जलतरणपटूंची फळी सुवर्ण जेएनएमसी स्विमिंग पूल, बेळगाव (ऑलिंपिक साईझ) येथे नियमित सराव करत असून, ‘स्विम गुरु’ उमेश कलघटगी यांच्या तज्ज्ञ मार्गदर्शनाखाली ते प्रशिक्षण घेतात. प्रशिक्षक अक्षय शेरेगर, अजिंक्य मेंडके, नितीश कुडुचकर, गोवर्धन काकतकर आणि इम्रान उचगावकर यांचे योगदानही उल्लेखनीय आहे.
जलतरणपटूंनी त्यांच्या यशात मोलाची भूमिका बजावणाऱ्या डॉ. प्रभाकर कोरे (अध्यक्ष, केएलई सोसायटी), जयंत हुंबरवाडी (अध्यक्ष, जयभारत फाऊंडेशन), रोटरीयन अविनाश पोतदार, सौ. मॅनेक कपाडिया, सौ. लता कित्तूर, सुधीर कुसाने, प्रसाद तेंडोलकर आणि इतर मान्यवरांचे मनापासून आभार व्यक्त केले आहेत.
बेळगावच्या वयस्क जलतरणपटूंनी साध्य केलेली ही ऐतिहासिक कामगिरी शहरातील नवोदित खेळाडूंनाही प्रेरणादायी ठरणार आहे. राष्ट्रीय स्तरावरही या जलवीरांकडून आणखी झळाळते यश मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

