बेळगाव जवळील बेळगुंदी गावात शाळेतील शिक्षकाने विद्यार्थिनीशी असभ्य वर्तन केल्याने ग्रामस्थानी शाळेत जावून शिक्षकाला बेदम चोप दिला. माध्यमिक शाळेतील विद्यार्थिनीशी शिक्षकाने गैरवर्तन केल्याची माहिती कळताच ग्रामस्थानी शाळेत जावून शिक्षकाला जाब विचारला. संतापलेल्या ग्रामस्थांनी वर्गातून शिक्षकाला बाहेर ओढून काढून त्याला चप्पलने मारहाण करून चांगलेच चोपले.
ही घटना कळताच शाळेबाहेर मोठा जमाव जमा झाला होता. मारहाण झालेल्या शिक्षकाने माझे बड्या नेत्याशी संबंध आहेत, माझे कोणी काही करू शकत नाही अशी भाषा ग्रामस्थ्यांच्या समोर केली. घटनेचे वृत्त कळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन संतप्त जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केला पण संतप्त ग्रामस्थानी पोलिसांच्या जीप समोर ठिय्या मांडला. अखेर कारवाई करण्याचे आश्वासन देऊन ग्रामस्थांची समजूत काढून शिक्षकाला ताब्यात घेतले.बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकाच्या हद्दीत ही घटना घडली आहे.

