ऊन आणि सावलीचा खेळ
पावसाने घेतली विश्रांती
बेळगाव:
मागील चार ते पाच दिवसापासून पावसाने विश्रांती घेतली आहे. त्यामुळे बुधवारी कधी ऊन तर कधी सावली असा ऊन आणि सावलीचा खेळ पाहायला मिळाला. त्यामुळे बुधवारी आकाश कधी पांढरे शुभ्र तर कधी पावसाने भरून आल्यासारखे काळपट दिसून आले. एकूणच ऊन आणि सावलीचा असा खेळ बुधवारी दिवसभर पाहायला मिळाला.
गणेशोत्सवामध्ये पावसाची रिपरिप सुरू होती. पण गणेश विसर्जनाच्या दिवसापासून पावसाने पूर्णपणे विश्रांती घेतली आहे. त्यामुळे कधी क्षणात पावसाचे वातावरण तर कधी एका क्षणांमध्ये उन्हाचे वातावरण तयार होत आहे. त्यामुळे नागरिकांना सोबत छत्री, रेनकोट घेऊन जावे लागत आहे. पण पाऊस न आल्यामुळे त्यांना छत्री आणि रेनकोटचे ओझे सोबत घेऊन जावे लागत आहे. मात्र काहीजण उन्हाच्या वेळी छत्रीचा वापर करताना दिसून आले. यामध्ये खासकरून महिला आणि ज्येष्ठ नागरिकांचा समावेश होता.
सायंकाळी चार नंतर मात्र ऊन गायब झाले. सायंकाळी सहानंतर ढगाळ वातावरण होते मात्र पावसाचा काही पत्ता नव्हता. त्यामुळे हवेत बऱ्यापैकी गारठा होता. पावसाने विश्रांती घेतल्यामुळे बाजारपेठेमध्ये देखील नागरिकांची गर्दी दिसून आली.

