बेळगाव शहरात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सुरू असलेल्या तपास मोहिमेदरम्यान माळमारुती पोलिसांनी एक गंभीर गुन्हा उघडकीस आणत तलवार बाळगणाऱ्या संशयिताला अटक केली आहे.
२४ मार्च २०२६ रोजी, पोलिस उपनिरीक्षक उदय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संशयास्पद व्यक्तींची तपासणी सुरू असताना ही कारवाई करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जीनेंद्र पद्मप्पा चौगले (रा. शास्त्री गल्ली, बसवन कुडची, बेळगाव) हा तरुण सार्वजनिक ठिकाणी हातात धारदार तलवार घेऊन फिरताना आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करताना आढळला.
तत्काळ कारवाई करत पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आणि त्याच्याकडून तलवार जप्त केली. या प्रकरणी माळमारुती पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ५५/२०२६ अंतर्गत भारतीय शस्त्र कायदा कलम २७(१) आणि केपी अॅक्ट कलम ९७ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
सध्या आरोपीविरुद्ध पुढील तपास सुरू असून, शहरात अशा प्रकारच्या घटनांवर आळा घालण्यासाठी पोलिसांनी गस्त वाढवली आहे.

