बेळगाव | प्रतिनिधी
वीर राणी कित्तूर चन्नम्मा सर्कल येथील कन्नड साहित्य भवन येथे हिंदू संम्मेलन समिती, सदाशिव नगर (बेळगाव) यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमासंदर्भात पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी आगामी वैचारिक व सांस्कृतिक अधिवेशनाची सविस्तर माहिती देण्यात आली.
या उपक्रमांतर्गत रविवार, दिनांक 01 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी 4 वाजता, सदाशिव नगर येथील गाणिग समाज अभिवृद्धी संघ मैदान (रेड्डी भवन समोर) येथे पहिला कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमास श्री. परमपूज्य अमरेश्वर महास्वामी (अडवी सिद्धेश्वर मठ, अंकलगी-कुंदरणी) यांचे दिव्य सानिध्य लाभणार आहे.
यावेळी वकील व सामाजिक कार्यकर्ते श्री. लक्ष्मण ग. नायक हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार असून, संस्कृत भारतीचे प्रांत मंत्री श्री. श्रीकांत कुलकर्णी तसेच राष्ट्र सेविका समितीच्या जिल्हा कार्यवाहिका सौ. अनुपा कौशिक (चिक्कोडी) हे वक्ते म्हणून मार्गदर्शन करणार आहेत. कार्यक्रमाच्या गौरव अध्यक्षपदी सौ. रत्नप्रभा बेल्लद राहणार आहेत.
दुसरा कार्यक्रम रविवार, दिनांक 08 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी 4 वाजता, शिव बसव मार्ग, शाहू नगर, बेळगाव येथे आयोजित करण्यात आला आहे. या वेळी श्री. प्र. ब्र. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामी (श्री गुरुशांतेश्वर संस्थान हिरेमठ, हुक्केरी) यांचे दिव्य सानिध्य लाभणार आहे.
या कार्यक्रमात युवा वाग्मी कु. हारिक मंजुनाथ (बेंगळूर) प्रमुख वक्त्या म्हणून उपस्थित राहणार असून, रा. स्व. संघाचे विभाग कार्यवाह श्री. संजय अडके हे वक्ते म्हणून विचार मांडणार आहेत. तसेच ज्येष्ठ प्रबोधनकार श्री. शंकर बांदकर (जीवनविद्या मिशन) हे अतिथी म्हणून सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमाच्याही गौरव अध्यक्षपदी सौ. रत्नप्रभा बेल्लद असतील.
हिंदू संम्मेलन समितीचे अध्यक्ष श्री. मारुती मसेकर, सचिव श्री. नंदिश कोरी, उपाध्यक्ष श्री. बसप्पा माळणीमनी व श्री. चंद्रकांत खंडागळे यांच्या नेतृत्वाखाली या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच समितीतील विविध पदाधिकारी व कार्यकर्ते या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सक्रिय सहभाग घेत आहेत.
धर्म, संस्कृती, समाजप्रबोधन व राष्ट्रीय मूल्यांची जाणीव निर्माण करण्याच्या उद्देशाने आयोजित या दोन्ही कार्यक्रमांना नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

