बेळगाव / प्रतिनिधी
भारतीय संस्कृती, इतिहास आणि राष्ट्रीय एकात्मतेचा जागर जागी प्रसार करण्याच्या उद्देशाने भारत विकास परिषदतर्फे आंतरशालेय “भारत को जानो” प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा रविवार, 12 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजता बुधवार पेठेतील जी. जी. सी. सभागृह, टिळकवाडी येथे पार पडणार आहे.
स्पर्धेत दोन गटांमध्ये विद्यार्थ्यांना सहभागी होण्याची संधी दिली जाणार आहे. कनिष्ठ गटात इयत्ता सहावी ते आठवी, तर वरिष्ठ गटात नववी ते बारावीपर्यंतचे विद्यार्थी सहभागी होऊ शकतात. प्रत्येक संघात दोन विद्यार्थी असतील.
स्पर्धेतील प्रश्न परिषदेकडून प्रकाशित ‘भारत को जानो’ या ग्रंथावर आधारित असतील, ज्यामध्ये देशाच्या इतिहासापासून ते सांस्कृतिक परंपरेपर्यंत सर्वांगीण माहिती समाविष्ट आहे. स्पर्धा चार फेऱ्यांमध्ये घेतली जाणार असून, विद्यार्थ्यांच्या ज्ञानाचा कस यामध्ये पाहिला जाईल.
विजेत्या विद्यार्थ्यांना आकर्षक पारितोषिके देण्यात येतील. याशिवाय प्रथम क्रमांकाचे विजेते प्रांतस्तरीय फेरीसाठी पात्र ठरणार, तर त्यानंतर दक्षिण भारत विभागीय आणि राष्ट्रीय स्तरावर स्पर्धा होतील.
अधिक माहितीसाठी स्पर्धा प्रमुख डॉ. जे. जी. नाईक आणि प्रा. अरुणा नाईक यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन परिषद अध्यक्ष विनायक मोरे यांनी केले आहे.

