भारत विकास परिषदेतर्फे ‘गुरु वंदना – छात्र अभिनंदन’ कार्यक्रम उत्साहात
बेळगाव : भारत विकास परिषदेतर्फे आयोजित ‘गुरु वंदना – छात्र अभिनंदन’ हा विशेष कार्यक्रम संत मीरा शाळेच्या माधव सभागृहात रविवारी संध्याकाळी मोठ्या उत्साहात पार पडला. या उपक्रमाद्वारे शहरातील नामवंत शाळांमधील 25 उत्कृष्ट शिक्षक तसेच 25 विद्यार्थी व 25 विद्यार्थिनींना गौरविण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात अक्षता मोरे यांच्या वंदे मातरम् गीताने झाली. मान्यवरांच्या हस्ते भारतमाता व स्वामी विवेकानंदांच्या प्रतिमांचे पूजन करून दीपप्रज्वलन करण्यात आले. अध्यक्ष विनायक मोरे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले, तर राष्ट्रीय महिला कार्यकारिणी सदस्या स्वाती घोडेकर यांनी परिषदेच्या सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक कार्याचा आढावा घेतला. प्राचार्य व्ही. एन. जोशी यांनी “गुरु वंदना” या संकल्पनेचे महत्त्व स्पष्ट केले.
यानंतर मान्यवरांच्या हस्ते उत्कृष्ट शिक्षकांना मानपत्र, शाल व स्मृतिचिन्ह, तर विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र आणि भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले. सत्कारमूर्तींनी आपली कृतज्ञता व्यक्त केली. कार्यक्रमाचे संयोजन जया नायक यांनी केले व शुभांगी मिराशी यांनी आभार मानले. राष्ट्रगीताने समारोप झाला.
शहरातील सरस्वती गर्ल्स हायस्कूल, लव्ह डेल सेंट्रल स्कूल, ज्योती सेंट्रल स्कूल, के.एल.एस. स्कूल, ज्ञान प्रबोधन मंदिर, जी.जी.सी. इंग्लिश स्कूल, बालिकादर्श विद्यालय, ठळकवाडी हायस्कूल, बी.के. मॉडेल हायस्कूल, संत मीरा हायस्कूलसह विविध शाळांमधील शिक्षक-विद्यार्थ्यांचा सहभाग होता.
या कार्यक्रमाला डॉ. व्ही. बी. यलबुर्गी, डी. वाय. पाटील, विनायक घोडेकर, सुभाष मिराशी, सुहास गुर्जर, चंद्रशेखर इटी, अमर देसाई यांच्यासह शिक्षक, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

