खानापूर (ता. 8 एप्रिल 2026): रामनगर–अळ्ळनावर मार्गावरील घार्ली क्रॉस येथे बुधवारी दुपारी सुमारे 3.30 वाजता झालेल्या भीषण अपघातात एका दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर संबंधित ट्रकचालक घटनास्थळावरून पसार झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
या अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव बाळकृष्ण यशवंत चौधरी (वय 60, रा. मालंबा, ता. जोयिडा, जि. उत्तर कन्नड) असे असून ते लुना दुचाकीवरून अळ्ळनावरकडून रामनगरकडे प्रवास करत होते.
पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार, HR-55/AU-1441 क्रमांकाचा कंटेनर ट्रक अतिवेगाने व निष्काळजीपणे जात असताना चालकाने नियंत्रण गमावले आणि दुचाकीला जोरदार धडक दिली. धडकेनंतर दुचाकीस्वार खाली कोसळले आणि ट्रकचे चाक त्यांच्या डोक्यावरून गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
अपघातानंतर ट्रकचालकाने वाहन न थांबवता घटनास्थळावरून पलायन केले. या प्रकरणी खानापूर पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक 115/2026 नोंदविण्यात आला असून भादंवि कलम 281, 106(1) तसेच मोटार वाहन कायदा कलम 134 व 187 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक श्रीमती आर. एस. सपाटे करत असून फरार चालकाचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहेत.

