बेळगाव : शांताई विद्याधार संस्था गेल्या 12 वर्षांपासून आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना शिक्षणाची साथ देण्याचे उल्लेखनीय कार्य सातत्याने करत आहे. वृत्तपत्र विक्रीतून जमा होणारा निधी या सेवाभावी उपक्रमाचा पाया असून, संस्थेने आजवर देशभरातील 500 हून अधिक विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक मदत पुरवली आहे.
मंगळवारी उद्दमबाग परिसरातील एका हॉटेलमध्ये माजी महापौर विजय मोरे यांनी भोजनासाठी थांबलेल्या वेळी, त्यांची नजर ग्राहकांना विनम्रतेने सेवा देणाऱ्या श्रेयश वाघमारे या तरुणावर गेली. त्याचा नम्र स्वभाव, मेहनती वृत्ती आणि जबाबदारीने केलेली सेवा पाहून ते प्रभावित झाले.
विचारपूस केली असता श्रेयश हा गोमटेश PU कॉलेजचा बुद्धिमान विद्यार्थी असून, शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी पार्ट-टाइम वेटर म्हणून काम करतो, हे उघड झाले. त्याच्या जिद्दीने प्रभावित झाल्यानंतर विजय मोरे यांनी अलान विजय मोरे आणि गंगाधर पाटील यांच्याशी चर्चा करून त्याला तत्काळ मदत देण्याचा निर्णय घेतला.
यानंतर शांताई विद्याधार संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी गोमटेश शिक्षणसंस्थेला भेट देत आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केली. संस्थेतर्फे श्रेयशच्या शैक्षणिक मदतीचा धनादेश अलान विजय मोरे आणि गंगाधर पाटील यांनी महाविद्यालयीन अधिकाऱ्यांकडे सुपूर्द केला.
श्रेयश एका एकल पालक कुटुंबातून येतो. त्याची आई उडुपाबाग परिसरात छोटा खानावळ व्यवसाय चालवते; दोन्ही मुलांच्या शिक्षणाचा खर्च भागवताना तिला मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते. संस्थेच्या मदतीमुळे या कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला असून, श्रेयशच्या शिक्षणाची वाट अधिक सुलभ झाली आहे.
समाजाच्या सहभागातून शिक्षणाचा उजेड वंचितांपर्यंत पोहोचवण्याचे काम शांताई विद्याधार संस्था गेली बारा वर्षे यशस्वीपणे करत असून, या उपक्रमामुळे अनेक विद्यार्थ्यांचे भविष्य उजळले आहे.

