बेळगाव | प्रतिनिधी
बांगलादेशात हिंदू समाजावर होत असलेल्या कथित अन्याय, अत्याचार व हिंसाचाराच्या घटनांच्या निषेधार्थ विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या वतीने शुक्रवारी सकाळी बेळगाव शहरात जोरदार आंदोलन करण्यात आले. राणी कित्तूर चन्नम्मा चौक येथे मोठ्या संख्येने कार्यकर्ते एकत्र येत या आंदोलनाने तीव्र स्वरूप धारण केले.
आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी बांगलादेश सरकारच्या प्रतिकृतीचे दहन करत संताप व्यक्त केला. तसेच मानवी साखळी करून चौकात रस्ता रोको आंदोलन राबविण्यात आले. भारत सरकारने बांगलादेशातील हिंदू बांधवांच्या सुरक्षेसाठी तातडीने ठोस व कठोर पावले उचलावीत, अशी जोरदार मागणी यावेळी करण्यात आली.
हातात संघटनेचे ध्वज घेऊन उपस्थित कार्यकर्त्यांनी विविध घोषणांनी परिसर दणाणून सोडला. आंदोलनामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता.
https://youtube.com/shorts/rvW6zN-7Eq8?si=g3eYxPUHMU_mfhk-
यावेळी माध्यमांशी बोलताना कारंजी मठाचे प.पू. श्री गुरुसिद्ध महास्वामीजी यांनी सांगितले की, बांगलादेशाच्या इतिहासात भारताची भूमिका महत्त्वाची राहिली असून, स्वातंत्र्याच्या काळात भारताने त्या देशाच्या जनतेला मोठे सहकार्य केले होते. मात्र सध्याच्या काळात बांगलादेशात हिंदूंवर होणाऱ्या अत्याचारांच्या घटना अत्यंत गंभीर असून, भारत सरकारने कूटनीतिक पातळीवर कठोर भूमिका घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली.

