कार्यक्रमाची सुरुवात मुख्याध्यापिका श्रीमती सोनाली कंग्राळकर यांच्या हस्ते शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला आणि देशभक्तीचा माहोल निर्माण झाला.
शिक्षिका अक्षता मोरे यांनी सादर केलेल्या प्रार्थनागीताने कार्यक्रमाला भक्तीभावाची सुरुवात झाली. विद्यार्थ्यांनी मावळे आणि शिवरायांच्या वेशभूषेत आकर्षक सादरीकरण करून उपस्थितांचे लक्ष वेधले. शिक्षिका संजना कट्टी यांनी शिवरायांच्या पराक्रमाची आणि दूरदृष्टीची माहिती देत विद्यार्थ्यांना प्रेरित केले.

शिवरायांच्या जन्मसोहळ्याचे प्रतीकात्मक ‘पाळणा’ सादरीकरण, स्फूर्तिदायक पोवाडा, पराक्रमावर आधारित नृत्यनाट्य आणि समूहगायन यामुळे वातावरण भारावून गेले. विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाला उपस्थितांकडून उत्स्फूर्त दाद मिळाली.
मुख्याध्यापिका श्रीमती सोनाली कंग्राळकर यांनी आपल्या भाषणात शिवरायांचे विचार आणि आदर्श जीवनात अंगीकारण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन शिक्षिका आरती चिंगळी यांनी केले. शिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

