बेळगाव : शहरातील केएलई सेंच्युरी चॅरिटेबल हॉस्पिटलमध्ये ६७ वर्षीय रुग्णावर यशस्वी किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया पार पडली असून, या कामगिरीमुळे वैद्यकीय क्षेत्रात आणखी एक महत्त्वपूर्ण यश नोंदवले गेले आहे.
या संदर्भात माहिती देताना केएलई संस्थेचे मानद अध्यक्ष डॉ. प्रभाकर कोरे यांनी सांगितले की, संबंधित रुग्णाला डायबेटिक किडनी डिसीजमुळे मूत्रपिंड निकामी होण्याच्या अंतिम टप्प्याला पोहोचले होते. परिस्थिती अत्यंत गंभीर असताना रुग्णाच्या ४७ वर्षीय मुलीने पुढाकार घेत किडनी दान केली. जिवंत नातेवाईकांकडून अवयवदानाचे महत्त्व या घटनेतून अधोरेखित झाले आहे.
ही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया युरोलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. आर. बी. नेर्ली यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. नेफ्रॉलॉजी विभागातून डॉ. अंजनेय यादवूर यांनी उपचारात महत्त्वाची भूमिका बजावली. तसेच अॅनेस्थेशिया तज्ञ डॉ. सुरेश एस.एन. आणि डॉ. निलेवेगी यांच्या टीमनेही शस्त्रक्रियेला यशस्वी बनवण्यात मोलाचे योगदान दिले.
https://youtu.be/38X44TxTPM0?si=3FQzcLgeADQ9aeio
या यशस्वी प्रत्यारोपणामुळे रुग्णाची प्रकृती स्थिर असून त्याला नवजीवन लाभले आहे. केएलई रुग्णालयाच्या तज्ज्ञ वैद्यकीय सेवांची ही आणखी एक उल्लेखनीय कामगिरी मानली जात आहे.

