बेळगाव : अत्याधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञानाचा वापर करून बेळगावमधील सुरण्णावर हॉस्पिटलने अस्थिरोग उपचार क्षेत्रात एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. शहरात प्रथमच रोबोटिक सहाय्यित जॉइंट रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया यशस्वीपणे सुरू करण्यात आली असून यामुळे रुग्णांना अधिक अचूक आणि सुरक्षित उपचार मिळणार आहेत.
या प्रगत तंत्रज्ञानामुळे शस्त्रक्रिया अत्यंत अचूकतेने करता येते, कृत्रिम सांध्यांची योग्य बसवणूक होते तसेच रुग्णांचा पुनर्वसन कालावधीही कमी होण्यास मदत होते. या उपक्रमामुळे आता बेळगावसह उत्तर कर्नाटकातील रुग्णांना जॉइंट रिप्लेसमेंटसारख्या प्रगत उपचारांसाठी मोठ्या महानगरांमध्ये जाण्याची गरज भासणार नाही.
https://youtube.com/shorts/7ItQ2iqkIOo?si=dXpiP0E7jsfJcFs5
सुरण्णावर हॉस्पिटलने आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत उत्तर कर्नाटकात प्रथमच आंतरराष्ट्रीय प्रशिक्षण फेलोशिप कार्यक्रम सुरू केला आहे. या उपक्रमाअंतर्गत विविध देशांतील अस्थिरोग तज्ज्ञ बेळगावमध्ये येऊन जॉइंट रिप्लेसमेंट व ट्रॉमा सर्जरीच्या आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण घेत आहेत.
या फेलोशिप कार्यक्रमाचे पहिले सहभागी रोमानिया (युरोप) येथील डॉ. ड्रॅगोस मिरोसू असून त्यांनी सुरण्णावर हॉस्पिटलमध्ये प्रशिक्षणास सुरुवात केली आहे. साधारणपणे भारतीय शल्यचिकित्सक प्रगत शिक्षणासाठी युरोपमध्ये जातात; मात्र आता युरोपमधील डॉक्टर बेळगावमध्ये येऊन प्रशिक्षण घेत आहेत, ही कर्नाटक आणि बेळगावसाठी अभिमानाची बाब असल्याचे मानले जात आहे.
नवीन तंत्रज्ञानाचा वापर करत सुरण्णावर हॉस्पिटलने आतापर्यंत सुमारे १० दुर्मिळ आणि गुंतागुंतीच्या अस्थिरोग शस्त्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण केल्या आहेत. त्यापैकी अनेक शस्त्रक्रिया उत्तर कर्नाटकात प्रथमच करण्यात आल्या आहेत. त्यामुळे गुंतागुंतीच्या अस्थिरोग समस्यांवर जागतिक दर्जाचे उपचार स्थानिक स्तरावर उपलब्ध होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
या यशाबाबत माहिती देताना डॉ. जगदीश सुरण्णावर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, अत्याधुनिक तंत्रज्ञान, कुशल वैद्यकीय तज्ज्ञ आणि जागतिक सहकार्याच्या माध्यमातून रुग्णांना दर्जेदार आरोग्यसेवा देणे हे हॉस्पिटलचे ध्येय आहे. भविष्यातही वैद्यकीय सेवा आणि प्रशिक्षण क्षेत्र अधिक बळकट करण्यासाठी प्रयत्न सुरू राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

