बेळगाव शहरातील श्रींगारी कॉलनी परिसरात आयोजित मोफत आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सामाजिक बांधिलकी जपत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, शहापूर उपनगर शिवशक्ती मिलन ‘वीर संगोळी रायण्णा’ तसेच केअर अँड क्युअर दवाखान्याच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर खासबाग येथील शिवतेज अपार्टमेंटमध्ये पार पडले.
या शिबिरात विविध आजारांची मोफत तपासणी करण्यात आली. डॉ. शुभम दळवी (BHMS) आणि डॉ. शिल्पा पुजारी (BHMS, CGO) यांच्या मार्गदर्शनाखाली मधुमेह, उच्च रक्तदाब, हिमोग्लोबिन तपासणी, सांधेदुखी, हाडांचे विकार यांसह विविध आरोग्यविषयक तपासण्या करण्यात आल्या.
रक्तदान शिबिरालाही नागरिकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला. ५० हून अधिक स्वयंसेवकांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवले. रक्तदात्यांना प्रोत्साहन म्हणून आयोजकांच्या वतीने हेल्मेट भेट देण्यात आले.
या उपक्रमात श्रींगारी कॉलनी, टीचर्स कॉलनी, बाडीवाले कॉलनी, कुंतीनगर आणि आसपासच्या भागातील सुमारे ४०० हून अधिक नागरिकांनी सहभाग नोंदवून आरोग्य तपासणीचा लाभ घेतला.
शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी दिनेश पाटील, प्रकाश पाटील, आकाश दलभजन, माधव मुरकुंबी, मंथन तारीहाळकर, राज कदम, सोहम हिंडलगेकर, लालू बाडीवाले यांच्यासह अनेक स्वयंसेवकांचे योगदान लाभले.

