बेळगाव (प्रतिनिधी): बेळगाव जिल्ह्यातील सौंदत्ती शहरातील रामसाइट भागात पोलिस कर्मचाऱ्याने स्वतःच्या पत्नीचा गळा चिरून खून केल्याची संतापजनक घटना घडली आहे. मृत महिलेचे नाव काशम्मा नेल्लिकट्टी (वय 35) असे असून, आरोपी पती संतोष हा पोलिस दलात पेढा (कॉन्स्टेबल) म्हणून कार्यरत असल्याची माहिती आहे.
सुमारे 13 वर्षांपूर्वी संतोष आणि काशम्मा यांचा प्रेमविवाह झाला होता. विवाहानंतर काही वर्षांनी संतोष याने पत्नीवर अवास्तव संशय घेण्यास सुरुवात केली. घरगुती कलह वाढत गेल्याने काशम्मा यांना मानसिक आणि शारीरिक त्रास सोसावा लागला. अखेर त्रासाला कंटाळून त्या पतीचा सहवास सोडून माहेरी परतल्या आणि नंतर त्यांची सवदत्ती येथील परिवहन विभागात बदली झाली.
त्यानंतर काशम्मा यांनी बैलंहोंगळ न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता. एप्रिल 2025 मध्ये त्यांना न्यायालयाकडून घटस्फोट मंजूर झाला होता. मात्र, विभक्त झाल्यानंतरही आरोपी संतोष याने तिचा पाठपुरावा सुरू ठेवला.
१३ ऑक्टोबरच्या संध्याकाळी संतोष याने सौंदत्ती येथील तिच्या भाड्याच्या घरात जाऊन वाद घातला आणि रागाच्या भरात पत्निचा गळा चिरून आणि वार करून तिचा खून केला. खून केल्यानंतर आरोपी संतोष घटनास्थळावरून फरार झाला.
तीन दिवसानंतर शेजाऱ्यांना घरातून दुर्गंधी येऊ लागल्याने त्यांनी पोलिसांना कळविले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेतला आणि हत्या प्रकरणाची नोंद करून आरोपी संतोषचा शोध सुरू केला आहे.
या घटनेने सौंदत्ती परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून, विवाहानंतर वाढणाऱ्या कौटुंबिक हिंसेच्या घटनांवर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

