बेळगावातील अनगोळ परिसरात धुलिवंदनाच्या दिवशी रंगोत्सव साजरा करताना वाजविण्यात आलेल्या “जय जय महाराष्ट्र माझा” या गाण्यावरून वाद निर्माण झाला आहे. या प्रकरणी कर्नाटक रक्षण वेदिकेच्या पदाधिकाऱ्यांनी टिळकवाडी पोलीस ठाण्यात आयोजकांविरोधात तक्रार दाखल केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अनगोळ भागातील राजहंस गल्ली येथे धुलिवंदनानिमित्त तरुणांनी रंग खेळत नृत्याचा आनंद घेतला. यावेळी ध्वनीप्रणालीवर “जय जय महाराष्ट्र माझा” हे गाणे लावण्यात आले होते. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर फिरू लागल्यानंतर काही कन्नड संघटनांनी तीव्र आक्षेप घेतला.
कर्नाटक रक्षण वेदिकेच्या पदाधिकाऱ्यांचा दावा आहे की, दुसऱ्या राज्याशी संबंधित गाणे वाजवल्यामुळे कन्नड भाषिकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. त्यामुळे संबंधित आयोजकांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी टिळकवाडी पोलीस ठाण्यात लेखी तक्रारीद्वारे केली आहे.
दरम्यान, या घटनेमुळे बेळगावात पुन्हा एकदा भाषिक संवेदनशीलतेचा मुद्दा चर्चेत आला आहे. पोलिसांनी तक्रार स्वीकारून प्रकरणाची चौकशी सुरू केल्याची माहिती मिळाली आहे.

