गोमांसाची वाहतूक करणारा ट्रक पेटवून दिल्याची घटना बेळगाव जिल्ह्यातील कागवाड तालुक्यातील ऐनापूर येथे सोमवारी मध्यरात्री घडली. रायबाग तालुक्यातील कुडची येथून अवैधरित्या गोमांस हैद्राबादला नेण्यात येत असल्याची माहिती ऐनापूर गावातील हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना मिळाली. ऐनापूर येथील श्री सिद्धेश्वर मंदिराच्या जवळ कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमले. कुडची येथून हैद्राबाद कडे जाणारा ट्रक कार्यकर्त्यांनी अडवला.
ट्रक अडवून ट्रकची तपासणी केली असता ट्रकमध्ये आठ टन पेक्षा अधिक गोमांस असल्याचे आढळून आले. ट्रकमधून गोमांस वाहतूक करण्यात येत असल्याचे पाहून हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी ट्रक चालकाला बाहेर काढून बेदम चोप देऊन ट्रक पेटवून दिला.ट्रक संपूर्ण बेचिराख झाला. या घटनेची माहिती कळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी जमावाला पांगवले. अग्निशामक दलाने घटनास्थळी दाखल होऊन आग विझवली पण तोपर्यंत ट्रक बेचिराख झाला होता. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. गोवंश हत्या आणि ट्रक पेटवल्या प्रकरणी पोलिसांनी एकूण सहा जणांना अटक केली आहे.

