चंदीगड, दि. ८ नोव्हेंबर २०२५:
भारतीय वैद्यकीय क्षेत्रातील सर्वोच्च सन्मानांपैकी एक मानल्या जाणाऱ्या नॅशनल अकॅडमी ऑफ मेडिकल सायन्सेस (NAMS) तर्फे बेळगावचे प्रख्यात अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. सारंग शेटे यांना “MAMS – Member of the Academy of Medical Sciences” या सन्मानाने गौरविण्यात आले. हा सन्मान चंदीगड येथील PGIMER येथे झालेल्या NAMSCON 2025 या ६५व्या वार्षिक अधिवेशनात प्रदान करण्यात आला.
या प्रतिष्ठित कार्यक्रमास नीती आयोगाचे सदस्य डॉ. विनोदकुमार पॉल, हरियाणाचे राज्यपाल प्रा. अशिमकुमार घोष, NMC चे अध्यक्ष डॉ. अभिजीत सी. शेट, ICMR चे माजी महासंचालक डॉ. व्ही. एम. काटोच आणि IIT कानपूरचे बायोइंजिनिअरिंग संचालक डॉ. अशोककुमार आदी मान्यवर उपस्थित होते.
या वर्षी देशभरातून केवळ ३ अस्थिरोग तज्ज्ञांना MAMS सन्मान मिळाला असून, गेल्या ३० वर्षांत फक्त ४७ ऑर्थोपेडिक डॉक्टरांना हा बहुमान लाभला आहे. त्यामुळे हा सन्मान अत्यंत दुर्मिळ आणि प्रतिष्ठेचा मानला जातो.
बेळगाव येथील KLE हॉस्पिटलमध्ये कार्यरत असलेल्या डॉ. सारंग शेटे यांनी Hip Arthroplasty या विषयात PhD (2024) प्राप्त केली असून, या विषयातील भारतातील मोजक्या संशोधकांपैकी ते एक आहेत. त्यांनी उत्तर कर्नाटकमध्ये प्रथमच ८ तास चाललेली “Total Femur Replacement (TFR)” ही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडली होती.
त्यांचे हाड आणि सांध्यांचे ट्युमर, लिंब सेल्व्हेज सर्जरी, तसेच गुडघा आणि नितंब प्रत्यारोपण क्षेत्रातील कार्य विशेष प्रशंसनीय ठरले आहे.
अलीकडेच IMA बेळगाव शाखेतर्फे त्यांना अस्थिरोग क्षेत्रातील योगदानाबद्दल सन्मानित करण्यात आले. त्यांच्या या यशाबद्दल KLE सोसायटीचे चेअरमन डॉ. प्र. के. डी. कोरे, CEO राहुल शिंदे, प्राचार्य डॉ. पवार, डॉ. माधव प्रभू, तसेच देशातील दिग्गज अस्थिरोगतज्ज्ञ प्रा. एन. के. मग्गु (PGI रोहतक) आणि प्रा. एस. एम. तुली (दिल्ली) यांनी अभिनंदन केले आहे.

